Earth NGO Medical Camp

Vyom Studios
3 min readMar 7, 2020

(हि पोस्ट २०१४ साली चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका मेडिकल कॅम्प बद्दल आहे. हा एक महत्वाचा विषय असल्या मुळे प्रत्यक्ष फोटो सोबतच कॅम्प बद्दल सुद्धा माहिती लिहीत आहे. त्यामुळे चंद्रपूर मध्ये आदिवासींसाठी काम करणारा माझा मित्र, डॉक्टर भूषण याच्या मोलाच्या कार्यामध्ये अनेक हात जोडले जातील अशी अशा आहे.)

२०१४ मधली गोष्ट आहे. ऑक्टोबर महिन्यात, ऐन दिवाळीत माझ्या काही डॉक्टर मित्रांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यात एक मेडिकल कॅम्प आयोजित केला होता. दिवाळीत सुट्टी पण मिळू शकेल आणि मेडिकल कॅम्प सोबतच आपली दिवाळी चंद्रपूर मधल्या आदिवासी बांधवांसोबत साजरी करता येईल म्हणून ऐन लुक्ष्मीपूजनाच्या दिवशी हि मंडळी धनकदेवी नावाच्या आदिवासींच्या गावात, वास्तव्यास असणार होती. या सगळ्या कॅम्प चे नियोजन चंद्रपूर मध्ये वास्तव्यास असणारा आणि आपल्या ‘EARTH’ (Education Action Research in tribal Health) या NGO मार्फत तिथल्या आदिवासींच्या सेवे साठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेला आमचा मित्र डॉ. भूषण मोरे करणार होता. (२०१४ ते २०१९ या काळात भूषण ने त्या भागात प्रचंड काम केलेले आहे.त्याच्या कामात आपला खारीचा वाटा कोणाला उचलायचा असल्यास भूषण चा नंबर मी देऊ शकतो.) या कॅम्प साठी पुण्याची माझी मैत्रीण डॉ भक्ती वारे (होमिओपॅथी), मुंबई हुन डॉ अनिकेत आवारे (डेंटिस्ट) हे दोघे जाणार होते. या सगळ्या डॉक्टर्स मंडळींना जमेल ती मदत करायला इंजिनीअर असलेली माझी मैत्रीण तरन्नुम शेख आणि माझा कॅमेरा गळ्यात अडकवून मी सुद्धा जायची तयारी केली. याच सोबत तिथल्या लोकांसाठी कपडे आणि औषधे आमच्या सोबत पाठ्वण्या साठी पुण्यातल्या अनेक मित्र मंडळींनी मोलाची मदत केली. यात निनाद पुराणिक, मंगेश दाभाडे, आकाश कुलकर्णी अशी अनेक नावे होती.

२ दिवस झालेल्या या मेडिकल कॅम्प मध्ये आपले तीनही डॉक्टर क्षणाचीही उसंत न घेता राबत होते. गावात डॉक्टर आलेत हे समजल्या वर आजूबाजूच्या अनेक गावांमधून इतकी आजारी लोकं आली, ती संख्या बघून तिथल्या बिकट परिस्थिती चा अंदाज आला. त्या लोकांचे आजार, जखमा, इंफिकशन्स बघता त्या जागी शहरातला माणूस असता तर त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची वेळ अली असती. तरीही ते आदिवासी स्वतःच्या पायाने अनेक मैल चालत आले होते आणि हसतखेळत बोलत होते. तिथे मी अनेक प्रकारचे फोटो काढले. तिथल्या खेड्यांमध्ये पोचण्यासाठी रस्त्यांची बिकट अवस्था, दिवाळी साजरी करण्याची आदिवासींची साधी सरळ पद्धत, दिवाळीतल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, इतकाच नाही तर डॉक्टर मंडळींच्या रेकॉर्डस् साठी तिथल्या पेशेंट च्या आजारांची लक्षण, छोट्या वीडेओक्लीप्स इत्यादी. पण या सगळ्यातला एक फोटो मात्र मला महत्वाचा वाटतो.

चंद्रपूर स्टेशन ला उतरल्या नंतर भूषण ने आम्हाला सांगितले होते की दातांचा पण डॉक्टर असतो हि कल्पनाच या लोकांना नाही. आजची तुमची भेट ऐतिहासिक आहे कारण आज पहिल्यांदा हि लोकं डेंटिस्ट ला बघणार आहेत. त्याच वेळेला माझ्या डोक्यात आल कि इथली परिस्थिती दाखवण्या साठी हा एक उत्तम मार्ग असू शकतो. आमचा मित्र डॉ अनिकेत जेवा तपासणी करत असेल त्या वेळी डेंटिस्ट ला पहिल्यांदा बघणारे लोकं कसे रिऍक्ट होतील ? तपासायला यायला घाबरतील का? आज आपण सर्रास पणे वर्षातून २ वेळा तरी डेंटिस्ट कडे जातो, अनिकेत ला तपासताना बघून यांच्या मनात नक्की काय येईल? ही भावना आपण टीपायची असे मनोमन मी ठरवले. धनकदेवी गावच्या एका झोपडीत अनिकेत ने प्लास्टिक ची खुर्ची, पत्र्याचा डबा, सोबत नेलेला बेसिन चा पाइप, नरसाळ अशा अशा मिळतील त्या वस्तूंपासून तपासणी साठी चा सेटअप तयार केला आणि आम्ही पेशंट ची वाट बघायला लागलो. झोपडी बाहेर बरीच गर्दी झालेली पण आत यायला कोणी तयार नव्हत. सगळे एकमेकांना तिकडच्या भाषेत कोपराने ढोसत, तू जा, तू जा असे खुणावत होते, काही किशोर वयीन मुलं आणि तरुण मुलं आपल्या मित्रांना जबरदस्तीने अतल्या बाजूला ढकलत चेष्टा मस्करी करत होते. शेवटी हो नाही करत, एक म्हातारा माणूस आत आला. खुर्चीत बसून त्याने अनिकेत समोर तोंड उघडलं आणि अनिकेत चक्रावला. त्याच्या तोंडात कॅन्सर होता. (पुढच्या दोन दिवसात अनिकेत ने लहान मुले,बायका, पुरुष म्हातारी माणसं असे अनेक पेशंट तपासले त्यातल्या ९० टक्के लोकांना कॅन्सर होता. कारण… खर्रा नावाच्या एका तंबाखूच्या पदार्थाचं व्यसन. खर्रा तोंडात ठेवला की भूक मरते. म्हणून लहान मुलांनाच त्यांचे पालक हे व्यसन लावतात.)

तो माणूस जेव्हा खुर्ची वर बसला होता, तेव्हा शक्य तितक्या फटिंमधून बाहेरची लोकं डोकावून बघताना मला दिसली आणि मला माझी फ्रेम मिळाली. त्यांच्या डोळ्यात भीती अणि उत्सुकता यांचं एक अजब मिश्रण भरून आलं होतं. इथे डेंटिस्ट येण्याचं महत्त्व अधोरेखित करण्या साठी मला त्यांचे चेहरे सब्जेक्ट म्हणून दाखवणे गरजेचं वाटलं. म्हणून मी फोरग्राउंड ला म्हातरबाबाची तपासणी करणारा अनिकेत अणि बॅकग्राउंड ला डोकावून बघणारी लोकं असं कंपोसिशन ठरवलं. पण त्यात फोकस मात्र मागच्या लोकांवर केला. कारण तिथल्या डेंटिस्ट च्या व्हिसिट च महत्व प्रत्यक्ष डेंटिस्ट च्या तपासणी पेक्षा मागच्या लोकांच्या चेहर्या वर अधिक दिसत होतं.

-पंकज हरोलीकर

--

--

Vyom Studios

Vyom Studios is a team of artists who uses camera, as a tool to express.